ठाणे : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती ( SOP ) २०२२ संपर्क पुस्तिकेचे प्रकाशन आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. दरम्यान यंदा पावसाळयात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरीकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री, हेल्पलाईन तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाला प्राध्यान्य देवून आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती ( SOP ) २०२२ संपर्क पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सदरच्या पुस्तिकेमध्ये आपत्तीपूर्वी आपत्तीमध्ये व आपत्तीनंतर महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कार्याबाबत विशेष माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शहरात एखादी आपत्ती घडल्यास मदत कार्यासाठी तात्काळ यंत्रणेशी संपर्क करण्याकरीता या पुस्तिकेत संबंधित सर्व विभाग तसेच अधिकाऱ्यांचे अद्ययावत संपर्क क्रमांकाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा म्हणाले की, सदर माहिती लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेतील अधिकारी, विविध विभाग, शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांना माहितीपूर्ण ठरणार असून सदर प्रमाणित कार्यपध्दती पुस्तिका महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुस्तिकेचा सर्व नागरिकांना आपत्तीवर मात करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मान्सून पूर्व कामांसंदर्भात देखील योग्य ते नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. संपूर्ण यंत्रणा मान्सून कालावधीकरिता सुसज्ज झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या अनुभवावर आधारित सन २०२२ सालची आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती ( SOP ) २०२२, संपर्क पुस्तिका तयार केली असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध विभाग, शासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांचेशी समन्वय साधून आपत्तीपूर्व नियोजनातून संभाव्य आपत्तीचे निराकरण करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री – १८०० २२२ १०८, हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० व ७५०६९४६१५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने दोन अतिरिक्त संपर्क क्रमांकाचा नव्याने समावेश करण्यात आला असून वरील क्रमांकावर संपर्क न झाल्यास ८६५७८८७१०१ व ८६५७८८७१०२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.