Thursday, December 5 2024 7:09 am

ठाणे महापालिकेची १०० कोटींची भरारी

• आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसात नागरिकांनी केला मालमत्ता कराचा विक्रमी भरणा
ठाणे (12) : मालमत्ता कराच्या विक्रमी वसुलीचा ओघ कायम ठेवत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसात १०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणेकरांनी मालमत्ता कर भरणा करण्यास दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने चालू (२०२३-२४) आर्थिक वर्षाची देयके ०१ एप्रिलपासून करदात्यांना पाठविण्यास सुरूवात केली. मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या या संदेशाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास यावर्षी सुमारे १००० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. त्यानुसार, नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत दहापट वाढ
गेल्या वर्षी १० मेपर्यंत ११.४६ कोटी रुपयांचा कर भरणा झाला होता. या वर्षी ही रक्कम १००.८५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा पट वाढ झाली आहे. तोच कल मालमत्ताधारकांच्या संख्येबाबतही आहे. गेल्या वर्षी या काळापर्यंत ६४१५ मालमत्ताधारकांनी कर भरला होता. ती संख्या यावेळी ७४ हजार ९०८ एवढी आहे.
ऑनलाईन कर भरणा सर्वाधिक
कर दात्यांपैकी ५१.२५ टक्के नागरिकांनी कर भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतला आहे. तर, ३३ टक्के कर दात्यांनी धनादेशाद्वारे कर भरणा केला आहे. रोख रकमेने कर भरणा करण्याचे प्रमाण आता ८.८० टक्क्यांवर आले आहे. तसेच, सर्वाधिक ३६.१९ कोटी रुपयांचा कर भरणा माजीवडा –मानपाडा क्षेत्रात झाला आहे. तर सर्वात कमी २.५४ कोटी रुपयांचा कर भरणा मुंब्रा भागात आहे. ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच ऑनलाईन कर भरणारे आणि ऑफलाईन कर भरणा करणारे यांच्याकडून प्रक्रियेबद्दलचा प्रतिसाद नोंदवून घ्यावा म्हणजे आपल्या यंत्रणेत तसे बदल करता येतील, अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांना दिल्या आहेत.
यापूर्वी, मालमत्ता धारकांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत देयके पाठवली जात होती. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देयक ऑनलाईन भरण्याची लिंक एसएमएसद्वारे उपलब्ध झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून करदात्यांनी मालमत्ता कर भरण्यास सुरूवात केली. मालमत्ता कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नसल्याने नागरिकांनीही या योजनेस भरघोस सहकार्य केले.
करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरुन उपलब्ध करुन घेवू शकतील. तसेच या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच GooglePay, PhonePe, PayTm व BHIM App याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात.
कर वसुलीसाठी उपाययोजना
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी- सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत . यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून अथवा इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोयीसुविधा वापरू शकतील. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची व कोणास भेटण्याची गरज पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रांवर सोमवार ते शनिवार स. १०.०० ते सायं. ५.०० वा. या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल. त्याशिवाय, ऑनलाईन कर भरणा सुविधाही कार्यरत आहे.
सवलत
पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितपणे महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. १५ जूनपर्यंत १० टक्के, ३० जूनपर्यंत ०४ टक्के, ३१ जुलैपर्यंत ०३ टक्के आणि ३१ ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास ०२ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

तक्ता १

प्रभाग समिती कर भरणा (कोटी रुपयांमध्ये)

माजीवडा – मानपाडा – ३६.१९
वर्तक नगर – २५.५२
नौपाडा-कोपरी – १०.८५
उथळसर – ८.९६
लोकमान्य नगर-सावरकर नगर – ४.०५
कळवा – ३.२५
दिवा – ३.५६
वागळे इस्टेट – २.७२
मुंब्रा – २.५४
मुख्यालय – २.९९
……………………

तक्ता २

करभरणा – रक्कम

ऑनलाईन – ५१.६९ कोटी
धनादेश – ३३.८० कोटी
रोख – ८.८७ कोटी
डीडी – ६.३७ कोटी
कार्ट पेमेंट – ०.१२ कोटी