Wednesday, April 23 2025 1:34 am

ठाणे महापालिकेची दिवा, मुंब्रा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे, 29 : ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत आज दिवा, मुंब्रा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली. नेताजी कम्पाऊंड, आचार गल्ली, दिवा पूर्व मुंब्रा देवी कॉलनी, आयडियल मार्केट, ठामपा उद्यानालगत, मुंब्रा, जुना मुंबई – पुणे रोड, कोलशेत वरचा गाव, सिद्धार्थनगर माजिवडा गाव येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचे धोरण ठाणे महापालिकेने स्वीकारले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली.

या कारवाईत, दिवा प्रभाग समितीतील नेताजी कम्पाऊंड येथे तळ अधिक तीन मजल्याचे सुमारे २५०० चौ. फूटाचे आर.सी.सी पूर्णत: निष्कसित करण्यात आले. त्याच भागात सुमारे ३००० चौ. फूटांचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कसित आले. सुफा हाईट समोर आचार गल्ली येथील साधारणपणे 6000 चौ.फूटाचे तसेच 3000 चौ. फूटाचे अशी दोन आर.सी.सी प्लिंथची बांधकामे पूर्णत: निष्कसित करण्यात आली.

याच प्रभाग समितीतील मुंब्रा देवी कॉलनी येथील प्रभाग क्र. 27 मध्ये आदर्श स्कूल समोर दिवा शिळ रोड येथील 2500 चौ.फूटाचे, दत्त मंदिराच्या बाजूला प्रभाग क्र. 28 मधील साधारणत: 3000 चौ. फूटाचे, मुंब्रा देवी कॉलनी येथील साधारणत: 3000 चौ. फूटाचे तसेच दळवी नगर दातिवली स्मशानभूमी जवळील साधारणत: 2800 चौ. फूटाचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कसित करण्यात आले. तसेच मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील आयडियल मार्केट येथील तळ अधिक एक मजली साधारण 3000 चौ. फूट क्षेत्र असलेले आरसीसी बांधकाम पूर्णत: निष्कसित करण्यात आले.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात, जुना मुंबई पुणे रोड येथील सुमारे 1600 चौ.फूटाचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कसित करण्यात आले.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात कोलशेत वरचा गाव येथील तिसऱ्या मजल्यावरील कॉलमचे बांधकाम मनुष्यबळाच्या सहाय्याने पूर्णत: निष्कसित करण्यात आले. सिद्धार्थनगर माजिवडा गाव येथील तळ अधिक एक मजला इमारतीचे पहिल्या मजल्यावरील आरसीसी स्लॅबचे बांधकाम ब्रेकर व मनुष्यबळाच्या सहाय्याने पूर्णत: निष्कसित करण्यात आले.