उन्हाळ्यावर मात करण्यासाठी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम
ठाणे (०८) : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.
नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत, माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, जवाहरबाग, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.