Friday, December 13 2024 12:20 pm

ठाणे, बेलापूर भगवेमय, मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे, 11 – रणरणत्या उन्हाची पर्वा न करता हजारो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील बेलापूर येथे प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी बेलापूर नंतर सायंकाळी ठाणे कोपरी पाचपाखाडी येथे भव्य रॅली काढली. या रॅलींमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ भगवेमय झाला होता. या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिली बार म्हस्के खासदार ही घोषणा केली.

राज्यात तीन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर उर्वरित २ टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचाराला रंग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या सभा, रॅलीत सहभाग घेऊन प्रचारात आणखी रंगत आणत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी दुपारी नवी मुंबईमधील बेलापूर परिसरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. या रॅलीत बोलताना ते म्हणाले की, शासनाने केलेली कामे, योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेले काम लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. ४०० पार चा नारा देतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पहिली बार म्हस्के खासदार’ ही घोषणा दिली.

सायंकाळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठाणे कोपरी पाचपाखाडी परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. शिवसेना गीत, शिवसेनेच्या जयघोषाने ठाणे मतदारसंघ दणाणून निघाला.

त्यापूर्वी कल्याणमधील 27 गावाच्या संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यात संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.