Thursday, December 5 2024 6:12 am

ठाणे – नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना – मंत्री उदय सामंत

मुंबई, 03 : जुना कळवा येथील छत्रपती शिवाजी चौक येथील पूलाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न येत नाही. ठाणे ते नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाईप लाईन रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीबाबत विधान परिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, 30 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन नाशिक रस्ता कामाची पाहणी केली. पाईप लाईन रस्त्याची पूर्ण डागडुजी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत. ठाणे – नाशिक रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडील आहे, ठेव काम (डिपॉझीट वर्क) म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ काम करीत आहे. या महामार्गावर परस्पर यु-टर्नच्या जागा करण्यात आल्या, काही ठिकाणी स्वत:च्या जागेत पार्किंग करण्यासाठी दुभाजक फोडले, ते बंद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भेटीवेळी दिल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या विद्यमाने हा रस्ता होत असून याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे.
मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, ठाणे ते बेलापूर रस्त्यावरील रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी साचण्याची तक्रार होती. सदर भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणासाठी 333 कोटी रूपयांचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर केलेला आहे. त्याला लवकरच मंजूरी मिळेल. कोपरी येथील तिसऱ्या पुलासाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात आला असून कारवाई सुरू आहे. तसेच ठाणे ते वडपे हा आठ पदरी रस्ता देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी दिलेल्या असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. या चर्चेत विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर यांनीही सहभाग घेतला.