मुंबई ११ :मुंबईकरांसाठी बेस्ट उपक्रमाने अधिकाधिक ई-बस सेवेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत लवकरच दुमजली ई-बस चालविण्यात येत असून उद्या, सोमवारपासून प्रीमियम बससेवा सुरू होणार आहे. वातानुकूलित आणि आरामदायी अशी वैशिष्ट्य असलेली बेस्टची प्रीमियम सेवा ठाणे ते बीकेसी मार्गावर धावणार आहे.
वातानुकूलित बससेवेप्रमाणेच ‘चलो’ मोबाइल अँपच्या साह्याने बसमधील आसन आरक्षित करता येईल. या सेवेसाठी २०५ रुपये भाडे आहे. ही बससेवा ठाणे ते बीकेसी मार्गावर सकाळी ७ ते सकाळी ८.३० वेळेत आणि बीकेसी ते ठाणे ही सेवा सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७ वेळेत दर अर्ध्या तासाने उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय सकाळी ८.५० ते सायंकाळी ५.५० या कालावधीत बीकेसी ते वांद्रे स्थानक, सकाळी ९.२५ सायंकाळी ६.२५ वाजता वांद्रे स्थानक बीकेसी मार्गावर प्रीमियम बस धावेल. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी ५० रुपये तिकीट आहे. बस मार्ग, अपेक्षित वेळ, त्या मार्गावरील उपलब्ध बससेवा याची माहिती या अॅपवर मिळेल.
प्रीमियम बससेवत बीकेसी ते ठाणे मार्गावर पहिल्या पाच फेऱ्यांसाठी १०० रु., बीकेसी ते वांद्रे स्थानकापर्यंत पहिल्या पाच फेऱ्यांसाठी १०रु. सवलत प्रवास उपलब्ध असून ही सवलत सात दिवस लागू असेल.