Tuesday, July 23 2019 1:51 am

ठाणे तहसील विभागाची कारवाई     5 बर्ज आणि 6 सक्शन पंप केला नाश

ठाणे -: रेती बंदर येथे अवैधरित्या रेती उत्खनन करणार्‍यांवर ठाणे तहसील विभागामार्फत शुक्रवारी कारवाईचा बडगा उगरण्यात आला. यावेळी 5 बार्ज आणि 6 सक्शन पंप खाडीतच कट करण्यात आले. सुमारे 55 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कारवाईची माहिती मिळताच रेती उपसा करणार्‍या इसमानी पाण्यात उडी मारत पळ काढला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैधरित्या होणार्‌या गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकार महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय खाडीतून वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. वाळूच्या उपशासाठी कांदळवनाचा र्‌हास केला जातो. कारवाईसाठी पथक खाडी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. अनेकदा जिल्हा प्रशासन आणि पोलिस मिळून संयुक्तरित्या गौण खनिज तस्करांवर कारवाईचा बडगा उगारतात. त्यात मुंब्रा रेतीबंदर येथील गणेश घाट परिसरात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती ठाणे तहसीलदार विभागाला मिळाली असता, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार आणि उप विभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार विभागाच्या वतीने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगरण्यात आला. यावेळी 5 बार्ज आणि 6 सक्शन पंप जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच या कारवाईची माहिती रेती माफियांना मिळताच खाडीत पाण्यात उड्या मारून पळ काढला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार विभागाच्या वतीने देण्यात आली.

यापुर्वी देखिल ठाणे तहसिलदार विभागाच्यावतीने रेती उपसा करणार्‍या विरोधात कावराईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यावेळी 15 कुंड्या रेतीसाठा जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त करून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली होत्या. तर, योगेश पाटील, दिनकर पाटील आणि अप्पराव हिलाल यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.