Tuesday, July 23 2019 2:40 am

ठाणे जिह्यात 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले

मुंबई-: मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषा आहे परंतु गेल्या दहा वर्षांत स्थलांतरामुळे येथील लोकसंख्येत मोठा बदल झाला आहे. मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली आहे तर हिंदी भाषिकांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. शेजारील ठाणे जिह्यात 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले आहे तर कल्याण आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचे चित्र आहे.

मातृभाषेसंदर्भातल्या 2011 सालच्या जनगणनेच्या अहवालानुसार मुंबई आणि महामुंबईतील मराठी भाषिकांची संख्या घटत चालली असून हिंदी भाषिकांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगड आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदुस्थानातून मोठय़ा संख्येने विविध भाषिक स्थलांतर करत आहेत. यात मराठवाडा, विदर्भातील 55 टक्के लोक आहेत तर उरलेल्या 45 टक्क्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱयांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या स्थलांतर आणि शहर अभ्यास विभागाचे प्रमुख राम. बी. भगत यांनी दिली.

ठाणे, रायगड, कल्याणमध्ये का वाढले हिंदी भाषिक

उपनगरांमध्ये औषध उत्पादन, गारमेंट, केमिकल फॅक्टरीज् तसेच विविध कारखाने उभे राहिले तर मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या कारखाने आणि गृहप्रकल्पांना कामगारांची गरज भासली. त्यांना बिहार, उत्तर प्रदेशातून आलेले मजूर, कामगार स्वस्तात उपलब्ध झाले.
या मजुरांना कमी भाडय़ात घरेही उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांनी उपनगरांमध्ये बस्तान बसवले.
बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या नियोजन आणि धोरणांमध्येही बदल झाला. परप्रांतीयासाठी विविध योजना आणल्या गेल्या, धोरणे राबवली गेली.
येथील राजकारणामुळे ठाणे, रायगड, कल्याण आणि मीरा-भाइंदरसारख्या मोठा मराठी टक्का असलेल्या शहरांमध्ये हिंदी भाषिकांची संख्या वाढली.
मग मराठी माणूस गेला कुठे?

काळानुरूप एकत्रित कुटुंब पद्धत मोडीत निघाल्यामुळे असेल किंवा मुंबईतील छोटय़ा जागेला मिळालेली ‘लाख’ मोलाची किंमत असेल, कारणे काहीही असू शकतात. पण मुंबईतील मराठी माणूस कल्याण-डेंबिवली नाहीतर वसई-विरारला निघून गेल्याचे सांगितले जात होते. हाती आलेली आकडेवारी मात्र वेगळेच धक्कादायक वास्तव मांडते. ठाणे जिल्हय़ात हिंदी भाषिकांच्या प्रमाणात 80 तर रायगडात 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, मराठी माणूस नेमका गेला कुठे?

10 वर्षांत हिंदी भाषिक 10 टक्क्यांनी वाढले
2001 मध्ये 25.88 टक्के हिंदी भाषिक होते.
2011 मध्ये हे प्रमाण 35.98 टक्के इतके झाले.
मराठी भाषिकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली

2001 मध्ये 46.54 लाख मराठी भाषिक होते.
2011 मध्ये हे प्रमाण 44.04 लाख इतके झाले.
गुजराती भाषिकांच्या संख्येत किंचित घट

2001 मध्ये गुजराती भाषिकांची संख्या 14.34 लाख होती.
2011 मध्ये ही संख्या 14.28 लाख इतकी झाली.
उर्दू भाषिकांच्या संख्येतही अडीच टक्क्यांची घट

2001 मध्ये 16.87 लाख उर्दू भाषिक होते.
2011 मध्ये हे प्रमाण 14.59 लाख इतके झाले.