ठाणे, 22 :- युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात येते. युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नेहरु युवा केंद्र व कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली 20 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली.
ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर विजयी होणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेले असल्याने युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने आवर्जून सहभागी व्हावे, यासाठी संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. या युवा महोत्सवाच्या निमित्ताने वय वर्ष 17 ते 21 या वयोगटातील जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
वयोगट व सहभाग पात्रता – या युवा महोत्सव स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 15 ते 29 वर्षे वयोगट राहील. (दि.01 एप्रिल 2023 रोजी परिगणना करण्यात येईल.), जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवांना या युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील.
या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, जिल्हा परिषद विस्तार अधिकारी मधुकर घोरड, सरळगाव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.सी.सरडे, नेहरु युवा केंद्राचे सुनिल गमरे, के.बी.पी.कॉलेजचे डॉ. एकनाथ पावले, संतोष गावडे, कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी विशाल माने, फिल्म व इव्हेंट डायरेक्टर डॉ. गणेश घुगरे हे उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील युवा महोत्सवाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांच्याशी जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी केले आहे.