ठाणे, 06 :- वाहतूक नियमांचं उल्लंघन ( Violation of Traffic Rules) करणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. यात ओव्हर स्पीड असो किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, सिग्नल तोडणे इत्यादी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर दंड आकारण्यात येतो. वाहतूक पोलिसांडून दंडाचे चलन (Traffic Fine Challan) मोबाईलवर पाठवून त्यानंतर दंडाची रक्कम वसुल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहनचालकांवर खटला दाखल करण्यात येतो. मात्र, अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असून, ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे (District Legal Services Authority, Thane ) यांच्या वतीने ९ डिसेंबर 2023 रोजी जिल्हा न्यायालय, ठाणे येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे महत्व पटवून देणे तसेच अशा खटल्यात तडजोड घडवून आणण्यास प्रयत्न करण्यासाठी दि.6 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर व 9 नोव्हेंबर 2023 रोजी वाहतूक शाखा तीन हात नाका येथे माहितीचा हेल्पडेस्क (Helpdesk ) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या हेल्पडेस्क वर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे.
यामध्ये वाहतूक चलनांचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी नागरिकांच्या वाहनांवरील दंडाच्या रक्कमेत तडजोडीअंती सूट दिली जाणार आहे. ज्या वाहनांवर प्रलंबित केसेस आहेत, अशा वाहन चालक, मालक यांनी दि.6 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर व 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तीन हात नाका येथील पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनचालकांवरील प्रलंबित दंडाची रक्कम तडजोडीनंतर दंड चलन कमी केले जाईल.
पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना ‘जिल्हा हेल्प डेस्क’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे ईश्वर सूर्यवंशी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली आहे.