Sunday, September 15 2019 11:29 am

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण

ठाणे :– ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली असून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. ५७४ खाटांच्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य सरकारने ३१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जिल्हा रुग्णालयाची इमारत ८३ वर्षे जुनी आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णालयाची जागा अपुरी पडत असून अनेक अद्ययावत वैद्यकीय सुविधांच्या अभावी रुग्णांची परवड होत आहे. त्यामुळे रुग्णालय व परिसराचा पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी ठाण्यातील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत होती. वारंवार केलेला पाठपुरावा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने आग्रह धरल्यामुळे राज्य शासनाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मंजुरी दिली होती. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात श्री. शिंदे यांनी आरोग्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळाली आणि फेब्रुवारी महिन्यात स्थलांतरासाठी आणि जून महिन्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला.

या नव्या रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा रुग्णालयात होणार आहे. त्याचबरोबर सिटी स्कॅन व डिजिटल एक्स रे सुविधांचे लोकार्पणही होणार आहे. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. मूळ ३३६ खाटांचे असलेल्या या जिल्हा रुग्णालयाच्या जागी आता ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होत असून त्यापैकी १४० खाटा या हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदी विकारांच्या संदर्भ सेवांसाठी असणार आहेत.

पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाच्या दोन सात मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीत अद्ययावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज जिल्हा रुग्णालय, तर दुसऱ्या इमारतीत संदर्भ सेवा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील विविध तपासणी विभाग कार्यरत असतील.

तिसऱ्या इमारतीत विविध प्रशासकीय विभाग, परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह यांसह विविध रुग्णालयीन विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची दालने व निवासस्थाने प्रस्तावित आहेत. तसेच, सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार असून यात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रिया गृह, लेसर उपचार पद्धती, रेटिना उपचार पद्धती आदी आधुनिक उपचारांचा समावेश आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, ऑटोक्लेव्ह रूम, डायलिसिस विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय, सर्व इमारतींसाठी सौर व्यवस्था, सेंट्रल ऑक्सिजन व सक्शन सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, १०० शव ठेवण्याची सोय असलेले शवागृह आदी सुविधा या नव्या रुग्णालयात असणार आहेत.

मेंदुविकार व मेंदु शल्यचिकित्सा विभागामुळे रस्ते अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून त्यामुळे या अपघातग्रस्तांचे जीव वाचवता येणार आहेत. सद्यस्थितीत ही सुविधा नसल्यामुळे अशा अपघातग्रस्तांना मुंबईला पाठवावे लागते, मात्र प्रवासात वेळ वाया जात असल्यामुळे तातडीने उपचार न मिळून अपघातग्रस्त दगावण्याचे प्रमाण मोठे आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि कर्करोगांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत असून या दोन्ही आजारांवरील उपचारांची सोय या ठिकाणी होत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

Attachments area