Friday, December 13 2024 11:27 am

ठाणे जिल्हा परिषदेमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, 29:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 147 – कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज, ठाणे जिल्हा परिषद येथे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या मतदान जनजागृतीस अधिकारी- कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 20 नोव्हेंबर रोजी आम्ही मतदान करणार असल्याचा विश्वासही कर्मचाऱ्यांनी दिला.
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावला पाहिजे, असे आवाहन केले. आपण स्वत: मतदान कराच, परंतु आपल्या घरातील सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संदेश जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांना मतदान करण्याची शपथही देण्यात आली.
यावेळी स्वीपचे सदस्य श्री.राजेंद्र परदेशी, श्री.अनंत सोनावळे, श्री.सिताराम परब, श्री.अविनाश सावंत तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.