ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार तर, जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार संपादक व छायाचित्रकारांचा सन्मान
ठाणे, 26 – जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने ३० मार्च रोजी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे उपस्थित राहणार असुन याप्रसंगी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार, संपादक आणि छायाचित्रकारांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ संपादक राजाराम माने भिवंडी येथील कुसुमताई देशमुख, नवी मुंबई, अंबरनाथ मीरा-भाईंदर, कल्याण येथील अनेक मान्यवर पत्रकारांचा समावेश आहे.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी समितीची महत्वाची बैठक शनिवार दि. १६ मार्च २०२४ रोजी ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा आणि मेळावा घेण्याचे ठरले. तसेच पत्रकारिता क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या जेष्ठ पत्रकार यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाणे जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यातून एक ज्येष्ठ पत्रकार किंवा एक फोटोग्राफर यांना पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये शनिवार ३० मार्च रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजता पत्रकारांचा मेळावा होणार आहे. याप्रसंगी जीवनगौरव पुरस्कारासह मान्यवर गौरवमूर्तीचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास ठाणे शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट – सर्वसाधारण सभेसमोरील विषय
ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात ३० मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर पुढील विषय घेण्यात येणार आहेत. मागील इतिवृत्रास मंजुरी घेणे, पत्रकार संघाच्या जमा खर्चास मंजुरी, जिल्हा पत्रकार संघाच्या कमिटीचा चेंज रिपोर्ट सादर करणे, बँकेत संघाच्या नावे नविन खाते उघडणे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या ठाणे तहसीलदार आवारातील कार्यालयाचे नूतनीकरण करणे, गावदेवी येथील पत्रकार भवनाची जागा ताब्यात घेण्याबाबत तसेच नवीन सदस्य नोंदणी अर्जास मंजुरी व अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळेस येणारे विषय या सर्वसाधारण सभेसमोर असतील.
चौकट – हे आहेत सत्कारमूर्ती
१) ठाणे – श्री. राजाराम माने, संपादक
२) नवी मुंबई – श्री. विश्वरथ नायर ,जेष्ठ पत्रकार
३) कल्याण : श्री.नाना पिसाट ,जेष्ठ पत्रकार
४) शहापूर:- श्री.प्रकाश परांजपे जेष्ठ पत्रकार
५) भिवंडी :- श्रीमती कुसुमताई देशमुख ,जेष्ठ पत्रकार
६) मुरबाड- श्री. सुधीर पोतदार ,जेष्ठ पत्रकार
७)अंबरनाथ- श्री. पांडुरंग रानडे, जेष्ठ पत्रकार
८ )मीरा- भाईंदर-अनिल खेडेकर,जेष्ठ पत्रकार
९)ठाणे -दीपक जोशी, जेष्ठ प्रेस फोटोग्राफर १०)अशोक गुप्ता ज्येष्ठ छायाचित्रकार आणि कॅमेरामन
११) ठाणे – प्रशांत सिनकर, ११पुरस्कारप्राप्त मुक्त पत्रकार
त्याचप्रमाणे, पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झालेले संपादक कैलाश म्हापदी व आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचाही या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य अधिस्वीकृती आणि जिल्हा समितीवर निवड झालेले ठाणे जिल्ह्यातील पत्रकार सदस्य, दिलीप सपाटे, विनोद जगदाळे,जयेश सामंत आणि संजय पितळे तसेच जिल्हा समितीवरील विभव बिरवटकर यांचाही या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे.