Tuesday, July 23 2019 2:04 am

ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट

ठाणे  : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे येथील उपकेंद्रात जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधीकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांची आवश्यक कामे उपकेंद्रातूनच होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी आज दिली.
ठाणे उपकेंद्रात बीबीए एलएलबी व बीएमएस एमबीए अभ्यासक्रम सुरु असून, 350 हून अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बीबीए एलएलबी अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या मुद्द्यावरुन आमदार डावखरे यांनी उपकेंद्राला शुक्रवारी भेट दिली. तसेच उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याबरोबर चर्चा केली. त्याचबरोबर इमारतीची पाहणी करुन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व विद्यार्थ्यांची मायग्रेशन, इलिजिबिलीटी, एनरोलमेंट आणि प्रवेशप्रक्रियेबाबतची आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया उपकेंद्रातूनच पूर्ण व्हायला हवीत. अशी कामे झाल्यानंतरच उपकेंद्र उभारण्याचा उद्देश साध्य होऊ शकेल, असे आमदार डावखरे यांनी म्हटले. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. सध्या बीबीए एलएलबी अभ्यासक्रमासाठी अवघे चार पूर्णवेळ शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. या ठिकाणी आणखी जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन आमदार डावखरे यांनी दिले. या प्रश्नांसंदर्भात विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात प्रश्न मांडण्यात येईल, असे ते म्हणाले.
—————-
चौकट
उपकेंद्राकडे जाणाऱ्या
रस्त्यासाठी प्रयत्न
बाळकूममधील निवासी संकूलामधून विद्यापीठाकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर बसची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना रिक्षाचा भुर्दंड सोसावा लागतो. या प्रश्नाची माहिती घेतल्यानंतर आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विद्यापीठाकडे येण्यासाठी पक्का रस्ता, विद्यापीठाकडे जाण्यासाठी फलक आणि टीएमटीच्या जादा बससाठी प्रयत्न करु, असे डावखरे यांनी सांगितले.