Tuesday, March 18 2025 12:17 am

ठाणे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शहर कार्यालयातील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी पथक ॲक्शन मोडमध्ये

ठाणे,21 :- अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर व मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात. यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे. या समितीची बैठक नुकतीच पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर येथे ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. पंजाबराव उगले यांच्या दालनात संपन्न झाली. एकूण 4 कोटी 1 लाख 94 हजार 718 रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 723 गुन्ह्यांमध्ये एकूण 859 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गणजे यांनी दिली.
या बैठकीस ठाणे शहर पालीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाण्याचे डॉ. विजय साळूंखे, अन्न व औषध विभाग ठाण्याचे सहायक आयुक्त रा.प.चौधरी, ठाणे डिव्हीजन पोस्ट विभाग ठाण्याचे दिनेश शिंगरे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाण्याचे निरीक्षक नंदकिशोर मोरे, ठाणे जिल्हा कृषी विभाग ठाण्याचे तंत्र अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गणजे उपस्थित होते.
या बैठकीत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. पंजाबराव उगले यांनी सूचना केल्या की, ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात येणाऱ्या बंद रासायनिक कंपन्यांपैकी एकूण २७ बंद रासायनिक कंपन्यांची तपासणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी अन्न औषध प्रशासन, अधिकारी यांच्या मदतीने केली आहे. तसेच इतरही URN रासायनिक कंपन्याची तपासणी करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या अंमली पदार्थ व्यसनग्रस्त रूग्णांकडून तेथील डॉक्टरांनी अंमली पदार्थाची विक्री व पुरवठाबाबत गोपनीय माहिती प्राप्त करून घेवून ती पोलिसांसोबत आदानप्रदान करावी. ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०५ व्यसनमुक्ती केंद्र असून त्यापैकी ०५ व्यसनमुक्ती केंद्रांना अंमली पदार्थ विरोधी पथक येथील अधिकारी व अंमलदार यांनी भेटी दिलेल्या आहेत. या भेटीदरम्यान अंमली पदार्थ विक्रीबाबत, पुरवठ्याबाबत माहिती घ्यावी व कारवाई करावी. ठाणे शहर आयुक्तालयातील गायमुख कासारवडली, कोलशेत कापूरबावडी, कोपरी आणि दूर्गाडी कल्याण येथील खाडी किनारी असलेल्या (Landing Point) वर लक्ष ठेवावे.
अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान, शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था या ठिकाणी बॅनर्स, भित्तीपत्रके व पुस्तिका, पोस्टर्स तयार करून प्रभावीपणे जनजागृती अभियान राबविण्यात आलेले आहे. हे अभियान पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी कायम पुढे सुरु ठेवावे. मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कफ सिरपची तसेच गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास अन्न व औषध विभागाच्या अधिकारी व अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे यांनी संयुक्त कारवाई करावी.
यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे यांनी माहिती दिली की, दि. 1 जानेवारी 2023 ते 28 नोव्हेंबर 2023 मध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गांजाबाबतच्या 43 केसेस दाखल झाल्या असून 1 कोटी 23 लक्ष 54 हजार 193 रुपये किंमतीचा 741 किलो 872 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे, आतापर्यंत यासोबत एकूण 53 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चरसबाबतच्या 6 केसेस दाखल झाले असून 72 लक्ष 74 हजार रुपये किंमतीचा 8 किलो 183 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोकेन बाबतच्या 02 केसेस दाखल झाले असून 58 लक्ष 80 हजार रुपये किंमतीचा 147 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 03 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मेफेड्रॉनबाबतच्या 31 केसेस दाखल झाले असून 84 लक्ष 19 हजार 870 रुपये किंमतीचा 1 किलो 820 ग्रॅम 6 मि.ग्रॅ.मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एलएसडी पेपर बाबतच्या 1 लक्ष 20 हजार रुपये किंमतीचा – 22 ग्रॅम वजनाचे एल.एस.डी 15 नग जप्त करण्यात आला आहे.
इतर गोळ्या व सिरपबाबत 11 केसेस दाखल झाले असून 35 लक्ष 81 हजार 690 रुपये किंमतीच्या 13 हजार 359 कफ सिरप बॉटल व 500 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेरॉईनबाबत 01 केस दाखल झाले असून 65 हजार रुपये किंमतीचे 13 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 01 आरोपीस अटक करण्यात आली आहे. सेवनार्थीच्या 629 केसेस दाखल करण्यात आल्या असून 711 आरोपीस अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे एकूण 4 कोटी 1 लाख 94 हजार 718 रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 723 गुन्ह्यांमध्ये एकूण 859 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गन्हे) डॉ. पंजाबराव उगले व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गणजे यांनी दिली आहे.