मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण
खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या या कामांची केली पाहणी
ठाणे 24 : ठाणेकरांना ध्यानधारणा आणि योग करण्यासाठी रहेजा संकुलासमोरच्या सुविधा भूखंडावर ध्यानमंदिर, कशिश पार्क येथे अद्ययावत ग्रंथालय, आणि हाजुरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुउद्देशीय अद्ययावत वास्तू अशा तीन सुविधांच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामांची पाहणी सोमवारी खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. या पाहणीच्यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले हेही उपस्थित होते.
या तिन्ही बांधकामामुळे ठाणेकरांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात यावे. या वास्तूंची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित केली जावी, असे प्रतिपादन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले.
तर, या सुविधांमुळे ठाणेकरांना पर्वणी मिळणार आहे. अत्याधुनिक पद्धतीचे ग्रंथालय, ध्यानधारणा मंदिर आणि उद्यान तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम, वाचन, खेळ आदी सुविधांसह अद्ययावत वास्तू अशा प्रकारच्या तीन सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या सुविधा लवकरच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त शंकर पाटोळे आणि मनोहर बोडके, उप नगर अभियंता शुभांगी केसवानी आणि सुधीर गायकवाड, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते.
ध्यान मंदिर व उद्यान
रहेजा संकुलासमोरील सुविधा भूखंडावर ध्यानमंदिर व हँगिंग गार्डन तयार करण्यात आले आहे. नागरिकांना येथे ध्यानधारणेसाठी सुविधा तसेच योगासनांसाठी सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पहिल्या मजल्यावर एका उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
धर्मवीर आनंद दिघे अद्ययावत ग्रंथालय
कशिश पार्क येथील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आठव्या मजल्यावर धर्मवीर आनंद दिघे अद्ययावत ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. या ग्रंथालयात सुमारे वीस हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर, संदर्भ ग्रंथ, वाय-फाय सुविधा, वाचनालय, चर्चासत्रासाठी छोटेखानी अॅम्फी थिएटर, छोटेसे उपहारगृह आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठ नागरिक नंदनवन
हाजुरी येथे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठ नागरिक नंदनवन या अद्ययावत वास्तूची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नंदनवन या संकल्पनेवर आधारित वास्तूची निर्मिती करण्यात आली असून या चार मजली वास्तूमध्ये बहुउद्देशीय सभागृह, व्यायाम शाळा, योग सेंटर, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळाच्या सुविधा आणि ग्रंथालय व वाचनालय या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.