ठाणे, २ : मोठमोठ्याने किंवा सलगपणे वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या डेसिबलच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. या हॉर्नचे प्रमाण आटोक्यात राहावे यासाठी ‘नो हॉर्न’ अशी मोहीम ठाण्यात सुरू झाली आहे. एक मार्चपासून ही मोहीम सुरू झाली असून ती ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. ठाणे महापालिका प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड यांनी हे जनजागृती अभियान हाती घेतले आहे. ही मोहीम केवळ रस्ते विभागासाठी नसून सगळ्या ठाणेकरांसाठी आहे.
यासंदर्भात रहिवासी क्षेत्र, शैक्षणिक मंच, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्याशी समन्वय साधून जनजागृती करण्याचे काम रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंडतर्फे केले जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक चरणजीतसिंग जस यांनी दिली. या पत्रकार परिषदेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपायुक्त अनघा कदम, रोटरी क्लबच ऑफ नॉर्थ एंडचे अध्यक्ष संदीप पहारिया, दिलीप माडिवाले, संजीव ब्रम्हे, राहुल खंडेलवाल, किरण झेंडे आदी उपस्थित होते.
विनाकारण हॉर्न वाजवला जातो, त्याचा आपल्याला त्रास होतो. सिग्नलला थांबलो असताना सतत हॉर्न ऐकू येतात. मात्र, एक जबाबदार नागरिक म्हणून हॉर्नचा वापर आवश्यक तेवढाच करायला पाहिजे, हे समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेतल्यास ‘नो हॉर्न’ ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी व्यक्त केला. ठाण्यात रस्त्यांच्या कामामुळे या मोहिमेत काही अडचण येणार नाही ना, या प्रश्नावर माळवी यांनी जबाबदारीने हॉर्न वाजवला तर कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट केले.
अवजड वाहनांच्या बाबतीत चालकांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येईल अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.
दरवर्षी पाच टक्के दराने वाहनांची संख्या वाढत असून ध्वनी प्रदूषणातील हॉर्नच्या आवाजाचे प्रमाण ५५ टक्के आहे हे लक्षात घेऊन ‘नो हॉर्न’ हेच आपल्या हिताचे असल्याचे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी स्पष्ट केले.