ठाणे, 11: महिला सक्षमीकरणाचा अनोखा सोहळा ठाण्यात रंगणार आहे. जिल्हा ठाणे अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “विभागीय, जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन” आयोजित करण्यात आला आहे.’सरस विक्री प्रदर्शन’ १२ मार्च ते १६ मार्च, २०२५ दरम्यान, गावदेवी मैदान, ठाणे स्टेशन रोड ठाणे -(प) येथे सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू लोकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये खास करून महिलांनी स्वतः बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे १७५ स्टॉल लावण्यात येणार आहे. त्यात ३५० हून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील (पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) तसेच इतर जिल्हयातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील.
महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सरसच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांना त्यांची उत्पादने दाखविण्याची व उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. या विक्रीतून बचत गटांच्या महिलांना उत्पन्न मिळणार आहे. या सरसच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादने व वस्तूंच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य आणि कला सादर करतील.
काय असेल खास?
विविधता: हस्तकला, वस्त्रोद्योग, घरगुती वस्तू, मसाले, लोणची, पापड, आणि अनेक पारंपरिक पदार्थांचे स्टॉल्स
गुणवत्ता: महिलांनी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना थेट बाजारपेठ
सक्षमीकरण: ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्याची संधी
मनोरंजन: खरेदीसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केले आहे.