Thursday, November 21 2019 4:25 am

ठाणेकरांना घेता येणार चंद्रभागेत देवत्व प्राप्त झालेल्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

ठाणे :- चंद्रभागेच्या पवित्र पात्रात स्नान केलेल्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्याची संधी ठाणे-कळवेकरांना प्राप्त झाली आहे. कळवा येथील कावेरी सेतू येथे ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आषाढी एकादशी ही विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असते. महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. या पालखीत सहभागी झालेल्या श्रमिकांना विठ्ठलभक्तीची आस लागलेली असते. मात्र, या धकाधकीच्या जीवनात अनेकांना विठ्ठल भेटीची आस लागलेली असतानाही पंढरपूरला जाता येत नाही. त्यामुळेच ठाणे आणि कळव्यातील विठ्ठलभक्तांना आपल्या देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी  विठ्ठल-रखुमाईच्या 4 फूट मूर्तीला कळव्यातील कावेरी सेतू येथे स्थानापन्न करण्यात येणार आहे. अखंड पाषाणातील ही मूर्ती पंढरपूर येथील चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करुन येथे आणण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता या दर्शन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तसेच, या ठिकाणी 10 हजार भक्तांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती प्रदान करण्यात येणार आहे, असेही आ. आव्हाड यांनी सांगितले.