Wednesday, February 26 2020 10:04 am

टोलनाका, कोपरी ब्रिजमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

·

–        टोलनाक्यापुढील नाल्यावर अतिरिक्त लेन्स

·       ऑक्ट्रॉय नाक्यालगतच्या नाल्यावर रस्ता करून वाहतूक वळवणार

·       रात्री गर्दीच्या वेळेस कोपरी पुलावर एक दिशा मार्ग

ठाणे  ठाणे-मुलुंड हद्दीवरील टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी, तसेच कोपरी पुलाचे काम सुरू होणार असल्यामुळे होणाऱ्या संभाव्य गैरसोयीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी पुलाच्या अलिकडे ठाणे ऑक्ट्रॉय नाक्याला लागून असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून तिथून वाहतूक वळवण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. उ.) एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केली. तसेच, टोलनाक्याच्या पुढे असलेल्या नाल्यावरही दोन्ही बाजूने स्लॅब टाकल्यास वाढीव लेन उपलब्ध होऊन टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, असेही श्री. शिंदे म्हणाले. त्याचप्रमाणे, दोन्ही दिशांकडून येणाऱ्या वाहनांची टोलवसुली एकाच ठिकाणी करण्याऐवजी स्टॅगर्ड पद्धतीने टोलनाके उभे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे टोलनाक्यांवरही अतिरिक्त लेन्स उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोपरी येथील रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या तुलनेत हा पुल अरुंद असल्यामुळे दिवसा आणि रात्री गर्दीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्याचा परिणाम टोलनाक्यावर होऊन येथेही वाहतूक कोंडी होत असल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी श्री. शिंदे यांनी सोमवारी या परिसराची पाहाणी करून विविध उपाय राबवण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्रामुख्याने टोलनाका ओलांडून ठाण्यात प्रवेश केल्यानंतर असलेल्या नाल्यावर दोन्ही बाजूने स्लॅब टाकून अतिरिक्त लेन निर्माण करणे, ठाणे ऑक्ट्रॉय नाक्याच्या जागेला लागून असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून त्या रस्त्यामार्गे वागळे इस्टेट, लोकमान्य नगर आदी ठिकाणी जाणारी वाहतूक फिरवणे, गर्दीच्या वेळेस कोपरी पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण कोपरी पुलावरील वाहतूक ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीसाठी खुली ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक बारा बंगला मार्गे वळवणे, गुरुद्वारा येथील सर्व्हिस रोडवर मध्यभागी उतरणारा पादचारी पुल रस्त्याच्या शेवटपर्यंत वाढवून सर्व्हिस रोड मोकळा करणे, अशा अनेक उपायांचा समावेश आहे. कोपरीतील अंतर्गत रस्त्यांचीही श्री. शिंदे यांनी पाहाणी करून आवश्यक तिथे रस्ता रुंदीकरण करून वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे, टोलनाका ओलांडल्यावर असलेल्या नाल्यालगत ज्याठिकाणी जुन्या कपड्यांचा बाजार भरतो, तिथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर तिथूनही थेट मुलुंडला प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे मुलुंड उड्डाणपुल आणि नवघर परिसरात होणारी वाहतूक कोंडीही दूर होणार आहे.यासंदर्भात श्री. शिंदे म्हणाले की, टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच कोपरी पुलावर येणाऱ्या वाहनांचे वर्गीकरण करून त्यांना अन्य मार्ग उपलब्ध करून देणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याच दृष्टीकोनातून ऑक्ट्रॉय नाक्यालगतच्या नाल्यावर स्लॅब टाकून त्या रस्त्यामार्गे वाहने ठाण्याकडे फिरवता येतील. तसेच, टोलनाका ओलांडल्यावर असलेल्या नाल्यावर दोन्ही बाजूला स्लॅब टाकून अतिरिक्त लेन्स उपलब्ध होत असल्यामुळे टोलनाक्यावरही वाहतूक कोंडीचा प्रश्न फारसा उद्भवणार नाही. एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ही कामे जलदगतीने करण्यात येतील. तसेच, मुंबई जकात नाक्याची काही जागा वाहतुकीच्या दृष्टीने मिळावी, यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.याच जोडीला टोलनाक्यांवर मनुष्यबळ वाढवणे, मशिन्सची संख्या वाढवणे, ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती हे उपायही करण्यात येत आहेत, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंते अनिल गायकवाड, एमईपीचे जयंत म्हैसकर, तसेच ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुंबईच्या प्रवेशद्वारावरील अन्य चार टोलनाक्यांच्या संदर्भातही तातडीने उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.