Tuesday, January 21 2025 4:19 am
latest

टेंभीनाक्याची दहिहंडी लोकल ट्रेन मध्येही लाईव्ह दिसणार

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची माहिती

ठाणे,6 : दहीहंडी म्हटलं की ठाणे असे समीकरणच आजतागायत महाराष्ट्रातील गोविंदा पथकांसाठी होवून बसले आहे. जी दहिहंडी सुरु करुन धर्मवीर आनंद दिघे यांनी दहिहंडी उत्सवाचा महाउत्सव केला ती टेंभीनाक्याची.. मानाची दहिहंडी यावेळी उत्साहात साजरी होणार असून यूट्यूब टिव्ही चँनलसह लोकल प्रवासात देखील प्रवाशांनाही लाईव्ह पाहता येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव त्याच जोमात, उत्साहात साजरा होत असून आनंद दिघे यांंनी सुरुवात केलेली परंपरा पुढे सुरु ठेवण्यात आली आहे.

टेंभीनाक्याची दहिहंडीपासून प्रेरणा घेऊन मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी उत्सव सुरू झाले. त्यामुळे आजही मुंबई ठाण्यातील सर्व गोविंदा पथके टेंभीनाक्यावर या दिघे साहेबांच्या.. मानाच्या दहीहंडीला येऊन सलामी देतात. शिस्तबध्द नियोजन हे या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य..

हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता वेगवेगळ्या दहीहंड्या असून प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थरांंकरीता आहे.
गोविंदा पथकांना जसे या हंडीचे आकर्षक आहे तसेच सर्वसामान्यांना ही टेंभीनाक्यावर साजरा होणारा उत्सव पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते म्हणून सर्व प्रसार माध्यमे, युट्यूब आणि मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये असणाऱ्या टिव्ही स्क्रीनवर ही हंडी लाईव्ह दिसणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

चौकट
टेंभीनाक्यावरील दहीहंडीचे टिझर प्रकाशित झाले असून मध्य रेल्वेच्या २० लोकल व पश्चिम रेल्वेच्या २० लोकलमधील प्रत्येक डब्यातील स्क्रीनवर दाखविले जात आहेत. तसेच दहीहंडीच्या दिवशी टेंभीनाक्यावरील उत्सवाचे थेट प्रक्षेपण प्रवाशांना पाहायला मिळणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.