Thursday, June 20 2019 3:32 pm

टीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे भाजपा सहकार आघाडीचे विभागीय संयोजक

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (टीडीसीसी) उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांना भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सहकारी आघाडीच्या ‘विभागीय संयोजक’ पदाची जबाबदारी देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या सात जिल्ह्यांची जबाबदारी कुऱ्हाडे  यांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सहकार क्षेत्रात पाय घट्ट रोवण्यास मदत होणार आहे.  
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेल्या टीडीसीसी बँकेचे १५ वर्षांपासून भाजपाचे एकमेव असे भाऊ कुऱ्हाडे संचालक असून विद्यमान उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकपदी नुकतीच दुसऱ्यांदा त्यांची निवड झालेली असून सहकारी क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याची दखल घेऊन कुऱ्हाडे यांना विभागीय संयोजकाची जबाबदारी मिळाली आहे. या माध्यमातून त्यांच्यावर सहकार क्षेत्रातील सात बड्या जिल्ह्यांच्या विभागीय संयोजक पदाची जबाबदारी राहणार असून या आघाडीचे प्रभारी अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी नुकतीच कुऱ्हाडे यांच्या नावाची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. ठाणे जिल्हा सहकारी बोर्ड संचालक, पतसंस्था फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष या सहकार क्षेत्रातील महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असून ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे मागील दोन टर्म भाऊ कुऱ्हाडे अध्यक्ष
आहेत. या महाविद्यालयात विविध शाखांमधील ८००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.