• २०१६ नंतर प्रथमच नवीन निविदा प्रक्रियेला मिळाला प्रतिसाद
• पाच वर्षांचा कालावधी
ठाणे 20 : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ३१० बस गाड्यांवरील जाहिरात उत्पन्नातून टीएमटीला पुढील पाच वर्षांत सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. २०१६ नंतर प्रथमच बसगाड्यांवरील जाहिरात हक्कांसाठी निविदा प्रक्रिया होत आहे. कोरोना काळ आणि अल्प प्रतिसाद यामुळे ही प्रक्रिया बराच काळ खोळंबली होती.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तसेच ठाणे महापालिका परिवहन समितीने केलेल्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात, टीएमटीच्या ताफ्यातील १५ एसी बसेस, ११० स्टँडर्ड बसेस, ९० मिडी बसेस, ‘जेएनयूआरएम’मधील नवीन आणि जुन्या ४५ बसेस, ५० तेजस्विनी बसेस अशा एकूण ३१० बस गाड्यांवर भाडेतत्त्वाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी जाहिराती देता येणार आहेत.
नवीन निविदेत जाहिरातींसाठी पाच वर्षांचा निविदा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी भाडे दरात ५ टक्के वाढ होईल. तसेच, कंत्राटदाराला एक महिना कालावधीचे आगाऊ जाहिरात भाडे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा करावे लागणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत सरासरी प्रती बस, प्रती महा ५७७६ रुपये दर मिळणार आहे. त्यात दर वर्षी पाच टक्के वाढ होऊन पाच वर्षात टीएमटीला सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
यापूर्वी, २०१० ते २०१३ आणि २०१३ ते २०१६ अशा काळासाठी जाहिरात निविदा काढण्यात आल्या होत्या. टीएमटीने २०१६मध्ये जाहिरातींची निविदा काढली होती. ती निविदा मुदतवाढ देऊन २०२१ पर्यंत सुरू होती. मात्र, त्यात २०१६ ते २०२३ मध्ये ताफ्यात नव्याने समविष्ट झालेल्या सुमारे २५० बसेसचा समावेश नव्हता. नवीन निविदा प्रक्रियेत एकूण ३१० बसगाड्यांवरील जाहिरातींचा समावेश आहे. अर्थात, त्यात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश नाही. कारण त्यांच्या जाहिरातींचे हक्क संबंधित कंत्राटदाराकडे आहेत.
सन २०१६ ते २०२३ या काळात १० वेळा निविदा काढण्यात आल्या. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. २०२१ ते २०२३ या काळात जाहिरातींची प्रक्रिया ठप्प होती. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करताना स्पर्धात्मक निविदेच्या अटी शर्तीत आवश्यक ते बदल करून तसेच, इतर परिवहन सेवांच्या दरांचा विचार करून ही प्रक्रिया करण्यात आली. त्यास निविदाकारांचाही अखेर प्रतिसाद लाभला. त्यामुळे आता परिवहन सेवेला जाहिरातीतून पुढील पाच वर्षांत सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य होणार आहे.
कोरोना काळ आणि बस गाड्यांची अनुउपलब्धता यामुळे बस गाड्यांवरील जाहिरातीतून टीएमटीला मिळणारे वार्षिक उत्पन्न ४० ते ५० लाख रुपयांवर आले होते. त्यात आता भरीव वाढ होईल, अशी टीएमटी प्रशासनाला आशा आहे.