Tuesday, June 2 2020 3:12 am

टाइगर ला जामीन मंजूर

जोधपूर :काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगात असलेल्या सुप्रसिद्ध कलाकार सलमान खानची आज अखेर सुटका झाली आहे.जोधपूर सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला.  सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावे लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये ’हम साथ साथ है’ चित्रपटाचे चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होते. त्यावेळी सलमानने भवाद गावात 28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. सलमानने काळवीटाची शिकार केली तेव्हा त्याच्यासोबत अभिनेता सैफअली खान, नीलम केठारी, सोनाली बेंदे , तब्बू हेदेखील होते. त्यामुळे हे सर्वजण या खटल्यातील सहआरोपी होते. गुरूवारी जोधपूर न्यायलयात झालेल्या सुनावणीत सलमानला न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली व दहा हजार रूपयांचा दंड ठोठवला. त्यानंतर सलमानची रवानगी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. दरम्यान सलमान खानच्या वकीलांनी सेशन कोर्टात जामीनासाठी अर्ज केले होते. जोधपूर सत्र न्यायलयात आज सकाळपासून सलमानच्या जामीन अर्जावर युक्तिवाद सुरू होता. जामीनवार सुनावणी पूर्ण झाली असून सलमानला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसह त्याच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सलमान खानच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र कुमार जोशी यांनी आज निकाल दिला. सलमानला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला. सर्व न्यायालयीन आणि तुरुंगातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.