ठाणे, 12 : महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, दलितमित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, धर्म, विद्यार्थी क्षेत्र व विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव व मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष म्हणून देखील श्री. बिरवटकर काम पाहत आहेत. तसेच आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम ते राबवित आहे. झोपडपट्टी तसेच मागासवर्गीय पाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश् आल्यामुळेच आदिवासी पाड्यांमध्ये नळ योजना सुरू झाली. तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आदिवासी पाड्यांमध्ये तसेच झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचविण्याचे काम केले. श्री. एकनाथ बिरवटकर हे गेली 28 वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग देखील भरवित आहेत.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना यापूर्वी मुंबई मित्र दैनिक तर्फे मुंबई अचिव्हर्स एक्ससिल्लेन्स अवॉर्ड पुरस्काराने देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आजवर विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार बहाल केला आहे. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.