मुंबई, 3 ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !