Monday, March 24 2025 7:03 pm

ज्ञानेश्वर म्हात्रे घ्या पारड्यात ठाण्यातून दीड हजार मतांचे शिवधनुष्य

ठाणे, २५ : कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रथम पसंतीची दीड हजार मते मिळवून देण्याचा भाजपाचे शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे संयोजक सचिन बी. मोरे यांनी निर्धार केला आहे. त्यादृष्टीकोनातून ठाण्यात प्रत्येक शिक्षक मतदाराबरोबर संपर्क साधला जात आहे. ठाण्यातून भाजपाला दीड हजार मतांचे शिवधनुष्य पेलवते का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना युतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आव्हान दिले आहे. त्यात नोंदणीकृत ३७ हजार मतांपैकी १४ हजार मते ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रात २०७१ मते आहेत. या मतांवर भाजपाच्या शैक्षणिक प्रकोष्टचे संयोजक सचिन मोरे व संभाजी शेळके यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक मतदाराची भेट घेण्यात येत आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात कायम उजव्या विचारसरणीच्या उमेदवाराला शिक्षकांची मते मिळाली होती. वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते अशी आमदारांची उज्वल परंपरा होती. मात्र, २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिक्षक परिषदेत फूट पडली होती. शिक्षक परिषदेतील मतविभागणीचा सहज फायदा शेकापच्या बाळाराम पाटील यांना झाला होता. मात्र, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी युतीचे निवडणूक प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या माघारीसाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आमदार बाळाराम पाटील यांनी सहा वर्षांच्या कारकिर्दीत ठाणे जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा मुद्दा प्रचारात मांडण्यात येत आहे. युती सरकारने विनाअनुदानित शाळांना दिलेल्या अनुदानाचा मुद्दा भाजपाच्या बाजूने आहे. त्यादृष्टीकोनातून भाजपाचे आमदार व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे संयोजक सचिन मोरे व संभाजी शेळके यांच्याकडून प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत शिक्षकांचे ठाण्यातून १०० टक्के मतदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.