Friday, December 13 2024 11:58 am

जोरदार शक्तीप्रदर्शन करत नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे, ३ – ढोल ताशाच्या गजरात, `जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के हे रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. मिरवणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नरेश म्हस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, मा. आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार संदीप नाईक, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी महापौर सागर नाईक, मनसे नेते अभिजित पानसे, रिपाइंचे भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवदेवतांचे दर्शन आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना मध्यवर्ती शाखा, तलावपाळी येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती यावेळी होती.
तलावपाळी मार्गे मामलेदार, कौपिनेश्वर मंदिर, सिद्धीविनायक मंदिर, चिंतामणी चौक, आनंदाश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करत कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला. तेव्हा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
मिरवणुकीत गाण्यांचा माध्यमातून प्रभू श्री रामाच्या नामाचा जयघोष झाला. विविध प्रांतातील नृत्याचे सादरीकरण करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत `अबकी बार फीर मोदी सरकार’ असा नारा कार्यकत्यांनी दिला.
मिरवणुकीत युवा सेनेचे पूर्वश सरनाईक, ठाणे शहर प्रमुख हेमंत मोरे, मनसेचे रवींद्र मोरे, भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, राम रेपाळे, राजेंद्र फाटक, युवासेनेचे नितीन लांडगे, सचिन भोसले, बाळा गवस आणि ठाणे, नवी मुंबई, बेलापूर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, मीरा भाईंदर येथील महायुतीचे नगरसेवक, महिला आघाडी, युवा सेना आणि हजारॊ कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची आमची भूमिका – गणेश नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची आमची भूमिका आहे. आमच्यासाठी राज्यातील सर्व ४८ जागा प्रतिष्ठेच्या आहेत. मोदींकरता महायुतीतील कार्यकर्ते आता कामाला लागले असल्याची प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून चांगले काम करणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.