Friday, December 13 2024 11:13 am

जीवनात यशस्वी व्हा किर्तीवंत व्हा…माजी सह पोलीस आय़ुक्त लक्ष्मीनारायण

ठाणे,27- जीवनात यशस्वी होण्याकरीता मेहनत हवीच पण, त्याबरोबर मी माझ्या आईवडिलांचे नाव देखील मोठे करणार आहे, या समाजाचे देशाचे नाव मोठे करणार आहे ही भावना देखील असणे महत्वाचे आहे असे मत ठाण्याचे माजी सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यानी व्यक्त केले.

आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने गडकरी रंगायत येथे झालेल्या करीअर गायडन्स कार्यक्रमात लक्ष्मीनारायण बोलत होते. या शिबिरासाठी ठाणे शहरातील इंग्लिश व मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिरात मार्गदर्शनासाठी श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन, मुख्य समन्वयक लोकसेवा आयोग परीक्षा अजित खराडे, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता – सहाय्यक आयुक्त श्रीमती. संध्या साळुंखे, कला दिग्दर्शक विजय कांबळे, प्रशांत स्कॉर्नरचे संस्थापक मालक प्रशांत सकपाळ आदी मान्यवरांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षा निकालात अव्वल गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

लक्ष्मीनारायण यानी त्यांच्या भाषणात करीअर घडवताना निश्चीत ध्येय ठरवून वाटचाल केली तर यश मिळते असे सांगितले. त्यासाठी त्यानी न्यूटन,एव्हरेस्टवीर अरुनिमा सिन्हा, अब्दुल कलामांसह अनेकांची उदाहरणे दिली. जीवनात असे यश संपादन करा की, ज्या शाळेत शिकलात त्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला बोलावल पाहिजे, तुमच्या सत्कारात आई वडिलाना सन्मान मिळाला पाहिजे आणि दुसरयांच्या ऑटोग्राफ, फोटोग्राफ साठी धावण्यापेक्षा तुमचा ऑटोग्राफ घ्यायला गर्दी झाली पाहिजे असे करीअर घडवा असे त्यानी सांगितले. मुख्याधापिका रेवती श्रीनिवासन यानी दहावी बारावीनंतर शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेस, अभ्यासक्रम यांची माहिती दिली. अजित खऱाडे यानी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबद्दल माहिती दिली. प्रशांत कॉर्नरचे प्रशांत कांबळे यानी आपण गरीबीमुळे कॉलेज शिक्षण घेऊ शकलो नाही, एका दुकानात काम करताना आपले पण दुकान असेल अशी जिद्द ठेऊन धर्मवीरआनंद दिघे साहेबांमुळे केवळ ६०० रूपये खिशात असताना एक टपरीवर दुकान सुरू केले. आज घडीला २०० कोटीचा व्यवसाय आम्ही करतो असे सांगतना मेहनतीला लाज बाळगायची नाही. जे ठरवाल ते प्रामाणिकणे करा, यश मिळतेच असे त्यानी सांगितले.

सुरूवातीला प्रास्ताविकात आयोजक खासदार राजन विचारे म्हणाले, याच वयात तुम्हाला पुढच्या जीवनाचा मास्टर प्लान करायचा आहे. दहावी नंतरची पाच वर्ष महत्वाची आहेत. तुम्ही आयुष्यात काय करायचे ठरवले आहे, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे आहे तुमच्या दहावीनंतच्या पाच वर्षात ठरणार आहे. कारण या पाच वर्षात आयुष्याच्या पूढील ५० वर्षाचा आलेख आखला जाणार आहे.