लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी
ठाणे, दि. १४ (जिमाका): जिल्ह्यातील प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता वेळेत देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांबाबत तालुका आणि नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे दिले.
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका आणि मनपा, नपा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचे १ लाख ४४ हजार ४८४ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्याची उद्दिष्ट पूर्ती १०४ टक्के झाली असून लाभार्थ्यांना एकूण ५ हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा केले जातात. पहिला हप्ता १ हजार रुपये आणि दुसरा व तिसरा हप्ता प्रत्येकी २ हजार रुपयांचा असतो. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ५३ कोटी ९५ लाख १३ हजार इतका निधी वितरित झाला आहे.
योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर रक्कम मिळण्यासाठी दरमहा तालुका सुकाणू समितीची सभा घेण्यात यावी, प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना डॉ. दांगडे यांनी दिल्या. आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका यांना उद्दिष्ट देऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तालुका आणि महापालिका स्तरावर प्रलंबित अर्जाबाबत शिबीर आयोजित करून प्रलंबित अर्जांची संख्या कमी करण्याचेही त्यांनी सांगितले.