ठाणे, दि. १४ (जिमाका): जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९ जून रोजी होणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा घेण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दांगडे यांनी पोलिओ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला. मागील पाचही मोहिमांमध्ये जिल्ह्याची कामगिरी १०० टक्क्यांहून अधिक झाली असून यावेळीही ही मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका आणि मनपा, नपा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड या तालुका क्षेत्रांमध्ये ही लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे एकूण १ लाख ७४ ५०२ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी १३७३ बुथ लावण्यात येणार आहेत. १२७६ टीम त्यासाठी करण्यात आल्या आहेत १७६ मोबाईल टिम तर ६२ ट्रान्झीट टीम आहेत.