Thursday, August 22 2019 4:32 am

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सव्वातीन लाख कुटूंबांना शिधापत्रिकाची सवलती मिळणार

नंदुरबार -: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या अर्थात प्राधान्य कुटूंब आणि अन्नसुरक्षा योजने अंतर्गत असलेल्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सव्वातीन लाख कुटूंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील वर्गवारी करण्याचे काम पुरवठा विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांनाही तातडीने रेशनकार्ड उपलब्ध करून देत या योजनेचा लाभ देण्यात येणार  आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा हे संपुर्ण तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील काही महसूल मंडळांमधील गावे दुष्काळी म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या सर्व गावांमधील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षका योजनेअंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे. या निकषानुसार उत्पन्नाच्या व इष्टांकाच्या मर्यादेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी यामध्ये त्यांच्या शिधापत्रिकांचे संगणकीकरण व शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सिडींग करून लवकरात लवकर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पीओएस मशिनद्वारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून त्यानुसार पात्र लाभर्थाची बायोमेट्रीक ओळख पटविल्यानंतर अन्नधान्य वितरीत केले जात आहे. त्यांच्या नोंदी एईपीडीएस प्रणालीवर उलब्ध असून पीओएस यंत्राच्या वापरामुळे पोट्रॅबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या सुविधेद्वारे पोट्रॅबिलिटीने पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ घेण्याची अनुमती याद्वारे देण्यात आली आहे. यामुळे दुष्काळीस्थितीमुळे स्थलांतर केलेल्या कुटूंबांना या योजनेअंतर्गत कुठल्याही दुकानातून सवलतीच्या योजनेतील अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अनेक कुटूंबे दुष्काळामुळे रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात तसेच काही कुटूंबे गुजरात राज्यात स्थलांतरीत झाली आहेत. त्यांना याचा कसा लाभ मिळणार याबाबत मात्र संग्धिता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकुण तीन लाख 21 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात अंत्योदय योजनेतील एक लाख पाच हजार 925, दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारकांची संख्या एक लाख 30 हजार 971, दारिद्रय रेषेवरील शिधापत्रिकाधारकांची संख्या 81 हजार 773 अशी आहे. दुष्काळी तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या पुढील प्रमाणे : नंदुरबार तालुका : अंत्योदय 18,742, बीपीएल 28,249, एपीएल 13,156. शहादा तालुका : अंत्योदय 22,050, बीपीएल 35,363, एपीएल 25,805. नवापूर तालुका : अंत्योदय 18,742, बीपीएल 28,449, एपीएल 13,156. तळोदा तालुका : अंत्योदय 12,149, बीपीएल 12,907, एपीएल 6,488. काही महसूल मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या धडगाव तालुक्यात एकुण 27,322 शिधापत्रिकाधारक कुटूंब आहेत. तर अक्कलकुवा तालुक्यात 47,056 शिधापत्रिकाधारक कुटूंबे आहेत.