Thursday, December 12 2024 8:22 pm

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली भिवंडीतील विविध कामांची पाहणी

भिवंडी 16 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी आज भिवंडी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामाविषयी माहिती घेत वेळेत काम पूर्ण करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी दिल्या. अनगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिक दृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जल जोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे व उप अभियंता पापू सासे यांना सुचना दिल्या.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत अकलोली ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पाहणी करण्यात आली. कामकाज तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थितींना दिल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा संदर्भातील जल जीवन मिशन अंतर्गत विहिरींची कामे पहाणी करून पाणी शुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर प्लान्टला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली. तसेच वज्रेश्वरी ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. पुढील महिन्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसंदर्भात पूर्व नियोजन करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यात्रेत स्वच्छ्ता, पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सोयीसुविधा बाबत पोलिस निरीक्षक गणेशपुरी धर्मराज सोनके, सरपंच, ग्रामसेवक व कमिटी सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे भेट देऊन रुग्णालयात सर्व सोयीसुविधाची प्रत्यक्ष पाहणी करून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कामकाज करावे असे मार्गदर्शन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी देखील करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता पापू सासे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी ठोंबरे, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, पंचायत समिती भिवंडी येथील अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते.