Thursday, November 14 2024 2:47 am

जिल्हा परिषदांनी बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेत – गिरीश महाजन

 

पुणे, दि. 4 : “राज्याचा ग्रामविकास साधायचा असेल तर महिलांना केंद्र स्थानी ठेवावे लागेल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्व जिल्हा परिषद यंत्रणांनी बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनासाठी सरकारी मालकीचे गाळे किंवा इमारती विक्री केंद्र म्हणून उपलब्ध करून द्याव्यात.” असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक यांच्यासाठी निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत बोलताना मंत्री श्री.महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्याच्या ग्रामीण महिलांनी खूप चांगले संघटन आणि बळकट संस्था उभ्या केल्या आहेत. त्यांच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सोबत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या इतर सर्व योजनासुद्धा ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे राबवाव्यात, ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजनेतून ग्रामीण तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण मिळायला हवे, ग्राम स्वराज्य अभियानातून राज्यातील प्रत्येक ग्रापंचायतीला सर्वार्थाने बळकट करण्यासाठी प्रभावी कार्यशैली अवलंबिली पाहिजे, अशा सूचनाही मंत्री श्री.महाजन यांनी केल्या.

ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उद्घाटन कार्यक्रमात सर्व योजनांची स्थिती आणि भविष्यातील नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. सामान्य माणसाला उपयुक्त धोरणे या विभागाकडून राबविली जावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाचे संचालक राजाराम दिघे, ग्रामस्वराज अभियानाचे संचालक आनंद भंडारी, अवर सचिव धनवंत माळी इत्यादी उपस्थित होते.