ठाणे, 7 – सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कक्षात आलेल्या लेखी अर्ज, निवेदनावर कार्यवाही करून तसा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने शासनस्तरावरील आपले अर्ज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरील या कक्षाचे काम सुरू झाले आहे. या कक्षात मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्वीकारण्यात येतील. हे अर्ज, निवेदने संबंधित विभागांना पाठविण्यात येतील. त्या विभागाने त्यावरील कार्यवाही केल्यानंतर त्याचा अहवाल अहवाल नियमितपणे मुख्यमंत्री सचिवालयास पाठविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना थेट मंत्रालयात जाण्याचे कष्ट वाचणार आहेत. स्थानिक पातळीवरच समस्या सोडविण्यास यामुळे मदत होणार असून अर्जदारांचा वेळ वाचणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.
या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्यअधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हे काम पाहत आहेत. तसेच या कक्षासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.