Thursday, December 12 2024 6:48 pm

जालना आणि अंबड शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*जालना जिल्हयातील विविध विषयांबाबत बैठक*

मुंबई 27:- जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जालना आणि अंबड शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जालना जिल्हयातील विविध विषयांबाबत बैठक झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अभिषेक कृष्णा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
जालना शहर राज्यातील व मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्यात येईल. यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. योजनेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कोणत्याही योजनेबाबत, प्रकल्पाबाबत शाश्वत विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रस्ताव सादर करण्यात यावेत. जेणेकरून संबंधित योजना, प्रकल्प स्वयंपूर्ण होतील. शहरातील अन्य सुविधांच्या प्रस्तावासंदर्भाही लवकरच कार्यवाही करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

*पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण गरजेचे*

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, जालना शहरातील पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण उपयुक्त ठरणार आहे. याव्दारे शहराला रोज पाणीपुरवठाही उपलब्ध होऊ शकतो. शहरातील मोती तलावाचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास करणे शक्य असल्याने त्यादृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच शहरातील अन्य सुविधांच्या कामांनाही गती देण्याची कार्यवाही करण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले. जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील केटीवेअरचे
बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील सूचनाही श्री दानवे यांनी यावेळी मांडली.

यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे यांनी देखील जालना शहर व जिल्ह्यातील विविध विषयांसंदर्भात सूचना मांडल्या.

यावेळी जालना नगर परिषदेची पाणी पुरवठा बळकटीकरण योजना-
जालन्यासाठी अतिरीक्त 35 द.ल.ली वॉटर ट्रीटमेंट प्लांट सहित घानेवाडी योजनेची दुरुस्ती, अंबड नगरपालिकेसाठी जालना पाणी पुरवठा योजनेतून अतिरिक्त उपाययोजना करून पाणीपुरवठा, शहराअंतर्गत पाणी व्यवस्थापनाचे बळकटीकरण,
सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, मुख्य रस्त्यांचे बांधकाम, देखभाल दुरुस्तीसाठी निधी, शहरात मार्केट विकसित करणे, जवाहरबाग/ मोती तलाव गार्डन विकसित करणे, मा
कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह विकसित करणे यासंदर्भातील प्रस्ताव याबरोबरच जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील केटीवेअरचे बॅरेजमध्ये रुपांतर करणे, भोकरदन शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, भोकरदन-जाफ्राबाद-
जालना-बदनापूर-अंबड तालुक्यासाठी जायकवाडी धरणावरून ग्रीड पाणी पुरवठा योजना यासंदर्भातील प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.