ठाणे 01 जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या येथे जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित रांगोळी, पोस्टर स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक, तृतीयपंथीयांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
१ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत विविध उपक्रम, विविध स्पर्धा आणि व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज रांगोळी, पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक एड्स दिन २०२२ ची संकल्पनाही Equalize – ‘आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्याकरिता’ आहे. त्याअंतर्गत एड्ससह जगणाऱ्या व्यक्तिंना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी यावर्षी भदभाव व कलंक मिटवून समानता आणणे या संकल्पनेनुसार विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज तलावपाळी येथे रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच उद्या सकाळी प्रभात फेरी आयोजित केली असून यावेळी विविध महाविद्यालयातील पथनाट्य सादरीकरण करणार आहेत. तसेच यावेळी आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या सुविधा केंद्रांना पारितोषिक वितरण, रांगोळी व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण होणार आहे.