मुंबई, 4 : अंबरनाथ शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचा स्वतंत्र प्रस्ताव केंद्र पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत गठित राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या शिफारशीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 15 एम.एल.डी. क्षमतेचे पॅकेज जलशुध्दीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, याद्वारे सद्य:स्थितीत सरासरी 5 एम.एल.डी. पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हे जलशुध्दीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर अतिरिक्त 15 एम.एल.डी. पाणी अंबरनाथ शहरास उपलब्ध होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य बालाजी किणीकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. पाटील यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, अंबरनाथ शहराचा पाणीपुरवठा करणारी 15 एमएलडी योजना कार्यान्वित झाल्याने त्याचा लाभ अंबरनाथसह बदलापूरला मिळणार आहे. सध्या अंबरनाथ व बदलापूर दोन्ही नगरपरिषद असलेल्या शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एकच उद्भव असून जलसंपदा विभागाकडून उल्हास नदीतून 140 एम.एल.डी. प्रतिदिन पाणी कोटा मंजूर असून, सध्या जलशुध्दीकरण केंद्राची उपलब्ध क्षमता व पंपिंग मशिनरी 24 तास संपूर्ण क्षमतेने चालवून 120 एम.एल.डी. प्रतिदिन पाणी उल्हास नदीमधून उचलले जात आहे. याशिवाय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, अंबरनाथ यांच्याकडून अंबरनाथ येथील पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या गळती वेळोवळी तातडीने दुरुस्त्या करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संवर्गात पदे रिक्त असून उप विभागीय अभियंता पदावर कार्यरत अधिकाऱ्यास अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.