Tuesday, December 10 2024 7:24 am

जलशक्ती अभियानाच्या कामांची केंद्रीय पथकाने केली पाहणी

ठाणे जिल्ह्यातील कामांवर केंद्रीय पथकाचे समाधान

ठाणे, 6 : केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या जाग्रिती सिंगला आणि केंद्रीय भूजल मंडळ विभागाच्या वैज्ञानिक वैष्णवी परिहार यांनी काल (दि.3 नोव्हेंबर) रोजी ठाणे जिल्ह्यातील जलशक्ती अभियानाच्या कामांची पाहणी केली. तलावातील गाळ काढल्यामुळे काय फायदे झाले याबाबत त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली व तलावात साठलेला पाणीसाठा पाहून समाधान व्यक्त केले.
ठाणे जिल्ह्यातील जलशक्ती अभियानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या सदस्य तथा केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या जाग्रिती सिंगला व केंद्रीय भूजल मंडळ विभागाच्या वैज्ञानिक वैष्णवी परिहार हे ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले होते. दि.2 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जलशक्ती अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते.
त्यानंतर श्रीमती सिंगला यांनी शुक्रवारी जलशक्ती अभियान अंतर्गत कामांच्या पाहणीसाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी भिवंडी तालुक्यातील कोन, कुंभारशिव, तळवली(लोणे) व आन्हे-सोर या गावांना भेट दिली.
यापूर्वी 1 जून रोजी त्यांनी मौजे कोन येथील कामाची पाहणी केली होती. त्यावेळी तेथे गाळ काढण्याचे काम सुरू होते. काल केलेल्या पाहणीत या तलावात पाणी वाढल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी या पथकाने सरपंच, ग्रामस्थांशी कामाबाबत व गाळ काढल्यामुळे झालेल्या फायद्याबाबत चर्चा करून माहिती घेतली.
आजच्या स्थितीत तलावात झालेला पाणीसाठा पाहिला असता या परिसरातील विहिरी तसेच विंधन विहिरी यांच्या पाणीपातळीत कश्या प्रकारे फरक जाणवत आहे, याबाबत उपस्थितांबरोबर चर्चा केली आणि तलावात झालेला पाणीसाठा पाहून समाधान व्यक्त केले.
कुंभारशिव येथील जल जीवन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या उदभव विहिरीमध्ये तयार करण्यात आलेल्या आडव्या विंधन विहिरीच्या कामाची पाहणी केली. या नळ पाणीपुरवठा योजनेबाबत भूवैज्ञानिक सपना बोरकर यांनी कामाची सविस्तर माहिती दिली. या योजनेच्या सर्व उपांगांची सविस्तर माहिती घेऊन कामाच्या यशस्वितेबद्दल श्रीमती सिंगला आणि श्रीमती वैष्णव यांनी समाधान व्यक्त केले.
मौजे तळवली (लोणे) शाळेकरिता तयार करण्यात आलेल्या छतावरील पावसाचे पाणी साठवण्याच्या योजनेची पाहणी केली. या योजने अंतर्गत सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती करून त्याद्वारे विंधन विहिरीतून पाणी उपसा करण्यात येत असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपअभियंता संजय सुकते यांनी दिली. या योजनेकरीता असलेल्या विंधन विहिरींचा दुहेरी वापर करण्यात येतो. यावेळी श्रीमती सिंगला यांनी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच उपस्थित सरपंच आणि सदस्यांबरोबर चर्चा करुन योजनेच्या यशस्वितेची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
आन्हे सोर नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची ही त्यांनी पाहणी केली. ट्रेंच गॅलरीमार्फत उदभव विहिरीत पाणी घेण्यात येत असल्याचे श्रीमती बोरकर यांनी सांगितले. भातसा नदीवर असलेल्या या योजनेची पाहणी केली.
ठाणे जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी केल्यानंतर निती आयोगाच्या सदस्या जाग्रिती सिंगला व केंद्रीय भूजल मंडळ विभागाच्या वैज्ञानिक वैष्णवी परिहार यांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यात उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक चव्हाण, जलशक्ती अभियानचे सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार आदी उपस्थित होते.