Monday, April 6 2020 1:24 pm

जमावबंदीच्या आदेशाने पालन न केल्यास नाईलाजाने कारवाई करावी लागेल : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही आज मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे. जनतेने स्वत:हून सरकारच्या सूचनांचं पालन करावं. असं न केल्यास नाईलाजाने जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी धोकादायक असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा विचार आहे. ज्या राज्यापासून अधिक धोका वाटतो, त्या राज्याच्या सीमा देखील बंद करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.घरातच थांबा आणि घरातच सुरक्षित अंतर ठेवा, . विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांना मधुमेह, अतिउच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांची विशेष काळजी घ्यायला हवी, असं टोपे यांनी सांगितलं.आतापर्यंत ६ ठिकाणी कोरोनाबाबतची चाचणी केली जात आहे. २७ मार्चपासून सर्व मेडिकल कॉलेजमध्येही लॅब सुरु होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टेस्ट करणं शक्य होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय खाजगी लॅबलाही केंद्राकडून परवानगी मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.