Saturday, September 18 2021 1:54 pm
ताजी बातमी

जन आशीर्वाद यात्रेतील गर्दी भोवली, सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोकण:  सुरू असलेल्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यासोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह तीस ते चाळीस जणांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात जमावबंदीचा आदेश मोडणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कणकवली पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रेच्या आधीच जमावबंदीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. पण हे आदेश झुगारत याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानेच हे आदेश देण्यात आले आहेत.

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्गात आली. यावेळी राणेंच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या जन आशीर्वाद यात्रेत संचारबंदीचे आदेश असतानाही गर्दी झाली. तसेच कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. तसेच निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी शिवसेनेकडून वैभव नाईक यांनीही शाखेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर जमावबंदीचे उल्लंघन आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत…!