Saturday, January 18 2025 7:18 am
latest

जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती

मुंबई, 23 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात विनंती केली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. या उमेदवारांनी मंत्री श्री.केसरकर यांचे पत्र पाठवून आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या ‘शासन आपल्या दारी- जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्गच्या शुभांगी कदम यांनी मंत्री श्री.केसरकर यांना याअनुषंगाने अर्ज दिला होता. आजच्या सुसंवाद कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमात सात अर्जदारांनी आपले अर्ज सादर केले. तर 14 व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेतून निवृत्तीवेतन मंजुरीचे प्रमाणपत्र, गौण खनिज उत्खनन परवाने, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. नवीन अर्ज सादर केलेल्यांपैकी एका पालकाची मुलगी तायक्वांदो खेळ प्रकारात राष्ट्रीय पातळीवर खेळली आहे, तथापि, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खर्च भागविणे शक्य होत नसल्याने त्यांना शासकीय योजनेतून लाभ देण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. तर दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एका नागरिकाच्या पुणे जिल्ह्यातील मालमत्तेच्या प्रलंबित असलेल्या मूल्यांकनाबाबत स्वत: मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी प्रश्न तातडीने मार्गी लावला. मंत्री श्री.केसरकर यांनी अन्य अर्जांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.