Saturday, July 11 2020 9:32 am

छोटा राजनच्या शुभेच्छांचे ठाण्यात बॅनर

ठाणे : राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरमध्ये सी. आर. सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) तसेच शुभेच्छुक म्हणून प्रकाश भालचंद्र शेलटकर (अध्यक्ष, ठाणे शहर) या नावांचा उल्लेख आहे. तसेच, बॅनरवर संस्थापक अध्यक्ष हेमचंद्र (दादा ) मोरे यांच्या नावाने छायाचित्र आहे. तसेच, अन्य दोघांचीही छायाचित्रे बॅनरवर असून हे बॅनर शहरातील कळवा, नौपाडा, तुळशीधाम आदी भागांत बसथांब्यावर लावण्यात आले होते. बॅनरवर छोटा राजनची १३ जानेवारी ही वाढदिवसाची तारीख टाकण्यात आली आहे. तसेच, छोटा राजनचे छायाचित्रही असून शहरात झळकलेल्या या बॅनरमुळे एकच खळबळ उडाली आहे. हे बॅनर कधी आणि कोणी लावले, याबाबत गूढ निर्माण झाले असून बॅनरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बसथांब्यावर बेकायदा लावलेल्या या बॅनरविषयी समजताच पालिकेने बॅनर काढून टाकले आहेत. तसेच, पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर नौपाडा आणि कळवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नौपाडा पोलिसांनी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून नाव असलेला प्रकाश शेलटकर याची चौकशी केली. मात्र, अद्याप त्याच्याविषयी काहीच माहिती समजली नसल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. बॅनर लावणाऱ्याचा शोध घेत जात असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. कळवा चौकात लावण्यात आलेला बॅनर रविवारी सकाळी काढण्यात आला. याबाबत चौकशी चालू असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला.