मुंबई, 06 : गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले सुधागड तालुक्यातील पिलोसरी गावचे प्रशांत नाडकर यांचे शुक्रवार, 5 मे रोजी प्रतीक्षा नगर येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 48 वर्षे होते. यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
प्रशांत नाडकर हे 1998 पासून इंडियन एक्स्प्रेस समूहात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. ते 2019 पासून दुर्धर आजाराने ग्रस्त होते. या आजारपणातच त्यांच्या दृष्टीवरही परिणाम झाला. परंतु खचून न जाता काही काळ त्यांनी आपले काम सुरू ठेवले. यानंतर 2020 साली आलेल्या करोनाकाळात नाडकर यांनी संपूर्ण मुंबई पिंजून काढली आणि करोनामुळे टाळेबंदीमधील मुंबईचे व रुग्णालयातील परिस्थितीचे चित्र कॅमेर्यात कैद केले. मात्र त्यानंतर दृष्टीवर खूपच परिणाम झाला आणि त्यांना काम करणे शक्य झाले नाही. गेले काही महिने ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र शुक्रवारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
मुंबईत 26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. त्यावेळीही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत नाडकर यांनी कर्तव्य बजावत महापूराची छायाचित्रे टिपली. याचसोबत 1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर मुंबईत झालेला बंद, मुंबईतील लोकल रेल्वे बॉम्बस्फोट, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, राजकीय घडामोडी आदी विविध महत्त्वपूर्ण घटनांची त्यांनी छायाचित्रे टिपली होती. नाडकर यांच्या अनेक छायाचित्रांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ते पत्रकार संघाचे माजी कार्यकारणी सदस्यही होते. मुंबईत कार्यरत असताना सुधागड तालुक्याशीही नाळ जुळली होती. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा ठाणे शहरातील सुधागडवासी आणि सुधागड तालुक्यातील गाव-पाड्यांशी जनसंपर्क होता.
कुठेही कोणतीही घटना घडली की नाडकर छायाचित्रे टिपण्यासाठी त्वरित घटनास्थळी पोहोचायचे. तसेच सर्वांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. एक बेधडक व बिनधास्त वृत्तपत्र छायाचित्रकार आणि चांगला मित्र, सेवभावी पत्रकार हरपल्याची भावना, नाडकर यांच्या वृत्तपत्र छायाचित्रकार मित्र व सुधागड तालुक्यातील ग्रामस्थ नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.