मुंबई, 3: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथील सर्व कर्मचारी या महिला असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज मुंबई, छत्रपती संभाजी नगर, खारघर येथे महिला संचलित पर्यटक निवासाचा शुभारंभ करण्यात आला.
महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग हा महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण शासनाद्वारे राबविण्यात येत आहे.
राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित धोरण आखण्यात आले असून त्याच्या पंचसुत्रीनुसार हे धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय यांच्यामार्फंत सर्व विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांनी तसेच पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर व अर्का उपहारगृह, खारघर येथे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने सर्व प्रादेशिक कार्यालये व पर्यटक निवासे येथे “आई” महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे.