Thursday, December 5 2024 6:51 am

छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याच्या निधीसाठी राज्य शासन मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 01 : छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांसाठी महत्वाच्या असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामे गतीने पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याचा निधीसाठी राज्य शासन मदत करेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर शहर नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संजय शिरसाट, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच.गोविंदराज, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, योजनेसाठी प्राप्त निधीमधून आत्तापर्यंत अनेक कामे पूर्ण झाली. जॅकवेल, जलशुद्धीकरण प्रकल्प, जलकुंभ, पाणी वितरण यंत्रणा, पाईपलाईन यातील असंख्य कामे पूर्णत्वास जात असून उर्वरित कामांसाठी निधी तातडीने देऊन योजनेच्या कामातील अडचणी दूर करण्यात येतील.

श्री.फडणवीस म्हणाले, योजना पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याच्या निधीची अडचण दूर करण्यासाठी राज्य शासन कर्ज तत्वावर निधी उपलब्ध करून देईल. यासाठी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, दोन वर्षाच्या कालावधीत पाणीपुरवठा योजनेतील कामे वेगात पूर्ण झाली आहेत. जलकुंभ पूर्ण झाले असून पाईपलाईनची कामे देखील पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, नगर विकास सचिव श्री गोविंदराज यांनी होत असलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली. ‘मजिप्रा’चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी प्रगती वरील कामांची माहिती दिली. मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांनी सादरीकरण केले.

पाणीपुरवठा योजनेत 1808 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 11 भव्य जल कुंभांची कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असून हिमायत बाग, टीव्ही सेंटर, हनुमान नगर, दिल्ली गेट, ज्युबली पार्क, मिसारवाडी, शिवाजी मैदान आदी ठिकाणी हे जलकुंभ पूर्ण होत आले आहेत. योजनेअंतर्गत शहरात एकूण 50 जलकुंभ उभारण्यात येत आहेत. यामध्ये 47 उभे जलकुंभ व तीन बैठे पूर्ण करण्यात येत आहेत. 600, 900 व 1200 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनची देखील कामे पूर्णत्वास जात आहेत.