Friday, January 17 2025 7:22 am
latest

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची होणार बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी

*• बायोमेट्रिकसाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी यांची नोंदणी प्रक्रिया सुरू*
*• १ ऑगस्टपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य*

*ठाणे (११) :* ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीसाठी नोंदणी सुरू आहे. १ ऑगस्टपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य होणार आहे. रुग्ण सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी उचलण्यात आलेल्या विविध उपायांपैकी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय यांची कार्यक्षमता वाढवणे, रुग्णांना जलद सेवा मिळणे आणि रुग्ण सेवेचा दर्जा उन्नत करणे, यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. सदर उपक्रमांचा भाग म्हणून दोन्ही ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा यांचा थेट संबंध आहे. डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहिले तर रुग्णसेवा सक्षम होण्यास फार मोठी मदत होते. रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी, विशेषत: वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

रुग्णांवरील उपचारासाठी अधिक मनुष्यबळ उभे करण्यासाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हजेरीचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी, तसेच कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून बायोमेट्रिक (फेस रीडिंग) हजेरी सुरू करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय या दोन्ही विभागातील सुमारे ८०० अधिकारी आणि कर्मचारी यांची बायोमेट्रिक पद्धतीसाठी नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली आहे. पुढील सात दिवसात नोंदणीची प्रकिया पूर्ण होईल. १८ जुलैपासून या प्रणालीची चाचणी सुरू होईल. तर, ०१ ऑगस्टपासून हजेरी पुस्तिकांची प्रक्रिया बंद होऊन पूर्ण हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होईल. त्यासाठी दर्शनी भागात उपकरणे बसवली जात आहेत.

असाच प्रयोग महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात आला. तेव्हापासून मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित होण्याच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याचप्रमाणे आता, रुग्णांसाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण वेळ उपलब्ध असावे, कामकाजाच्या वेळेत कर्मचारी त्यांच्या जागेवर हजर असावेत, यासाठी प्रशासकीय सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे, वेळेवर उपस्थित राहण्यास वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी प्रवृत्त होतील. रुग्णांना कुठेही तिष्ठत राहावे लागणार नाही. तसेच, रुग्ण सेवेचा दर्जाही उन्नत राहील, असे या संदर्भात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.