Thursday, December 12 2024 7:49 pm

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र गीताचा स्वीकार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. या जयंती दिनापासून “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताचा स्वीकार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाने 1 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य गीताची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत अंगिकारण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करुन सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित कार्यालय प्रमुखांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तसेच त्यानंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.