Tuesday, July 23 2019 1:51 am

छंद, आवड – निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे – ठाणे परिवहन कर्मचारी पाल्यांच्या गुणगौरव समारंभात नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन   

ठाणे -: छंद, आवड – निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. मेहनतीशिवाय फळ नाही. त्यामुळे आताच्या स्पर्धात्मक युगात प्रामाणिकपणे कष्ट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. वागळे आगार येथील स्व. निर्मलादेवी चिंतामणी दिघे सभागृहात ठाणे परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था आयोजित सभासद पाल्य गुणगौरव समारंभ कार्यक्रमात म्हस्के बोलत होते. यावेळी दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

टीएमटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभाचे यंदाचे २६ वे वर्ष असून यंदाही विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी करिअर मार्गदर्शक संतोष चौधरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, परिवहन सदस्य प्रकाश पायरे, राजेंद्र महाडिक, डॉ. अजित बुरुड, टीएमटी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख उपस्थित होते. दरम्यान, परिवहन सेवेच्या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून इतर पतसंस्थांमध्ये घडणारे अपहाराचे प्रकार येथे घडत नाहीत. याबाबत नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तर पतसंस्थेकडून होणारा  विद्यार्थ्यांचा गुणगौरव निश्चितच कौतुकास्पद असून घरच्या मंडळींकडून होणाऱ्या कौतुकासारखे दुसरे सुख नाही, असे मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी म्हस्के यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळेच आज पतसंस्थेचा कारभार अद्यावत जागेत सुरु आहे. अन्यथा पतसंस्था बंद करण्याची वेळ आली असती, असे मत पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक, टीएमटी एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार मनोहर जांगळे यांनी मांडले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष किरण कदम, उपाध्यक्ष सतीश लादे, सचिव भास्कर पवार, खजिनदार पांडुरंग सानप, संचालक दिलीप चिकणे, प्रवीण विचारे, विजया मुकादम, प्रतिभा घाडगे, तज्ञ संचालक शशिकांत शिंदे, परिवहनचे अधिकारी दामोदर नानकर, कर्मचारी व विद्यार्थी  वर्ग उपस्थित होते.